Continued from आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – १
आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – २
पुढे काय?
‘डिक्की’ला हे सर्व अपेक्षित होते, त्यामुळे एका बसची व्यवस्था आधीच केलेली होती. बस १०-१५ मिनिटात येणार होती. आम्ही विमानतळाबाहेर आमच्या ‘डफल’ बॅग्ज आणल्या आणि बसची वाट बघत होतो. एवढ्यात एक टोयोटा गाडी तिथे आली. त्यातून काही भगवी कफनी घातलेले लोक खाली उतरले. तेवढ्यात त्या गाडीत पुढच्या सीटवर नेपाळचे मोट्ठे मॉंक बसलेले डिक्कीला दिसले. ‘डिक्की’च्या चेहऱ्यावरचा आनंद पंतप्रधान दिसल्याचा होता. त्यांच्या गाडीभोवती त्यांच्या भक्तगणांचा घोळका होता. अनेक मॉंक त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रांग लावायला लागले. त्यातून वाट काढत ‘डिक्की’ पुढे गेली. आपल्याजवळची रुद्राक्षाची माळ त्यांच्या हातात दिली. त्यांनी ती डिक्कीच्या गळ्यात घातली. जणू त्यांचे आशीर्वादच आमच्या संपूर्ण ट्रेकसाठी ‘डिक्की’ने मिळवले होते.
हे असे नुसतेच थांबणे जरी निरर्थक वाटले, तरी निरर्थक नव्हते. ट्रेकला बरोबर आलेल्या लोकांची ओळख या मिषाने होत होती. कोणी या परिस्थितीवर जोक्स करत होते, तर कोणी वैतागले होते. लोकं आपापल्या छोट्या ग्रुपबरोबर या ट्रेकला आली होती. एक डेंटिस्ट डॉक्टरांचा ग्रुप होता. एकत्र शिकलेले, पण आता पतिपत्नी असलेले दोन डॉक्टर त्यांच्या मुलीला घेऊन आलेले होते. त्यांच्याबरोबर शिकलेला ‘केतन’ आता इंग्लंडमध्ये होता, पण रियुनियन म्हणून या ट्रेकला आला होता. ‘निपाणी’ वरून अजून बालरोगतज्ज्ञ असलेली दोन जोडपी होती. एक चार मैत्रिणींचा ग्रुप होता. असे ग्रुप आपापसात गप्पा गोष्टी करतानाच, आपापल्या ग्रुप बाहेरच्या लोकांचा देखील अंदाज घेत होते. कुणाशी जमेल याचा अंदाज घेत होते.
बघता बघता बस आली, सामान चढवले आणि सर्वजण बसमध्ये बसले. एवढ़े होईपर्यंत साडेनऊ वाजले होते. पोखरापर्यंतचे अंतर २१० किलोमीटरच्या आसपास होते. पण आधी काठमांडूमधून बाहेर पडता पडता तासभर गेला आणि मग रस्ताच नव्हता. खरोखर रस्ता नव्हता. सर्व रस्ता उखडून टाकला होता. म्हणे नवीन करण्यासाठी ! पण नवीन करायचा तर सेक्शनमध्ये उखडून नीट करावा. पूर्ण रस्ता उखडून टाकायची काय गरज? कोणीतरी म्हणाले की, चीन रस्ता करायला मदत करतो आहे. कदाचित हा ‘चिनी वे’ असेल. आता बस अगदी सावकाश खड्ड्याखुड्ड्यातून चारी अंगाने डचमळत चालली होती. एक कॉफी स्टॉप झाला. नंतर जेवणासाठी गाडी थांबली. पहिल्या दिवसाची ‘डाळ भाता’ची थाळी समोर आली. आता पुढचे आठ दिवस रोज हेच जेवायचे होते. जेवण झाल्यावर समोर एक टेकडी दिसली. अजून आमच्याबरोबर असलेले शेर्पा लोकं जेवण करत होते. वेळ होता आणि ट्रेक करण्यासाठी लोकं आतुर होती. स्फुरण चदलेल्या पायांनी काहीजण त्या टेकडीवर गेले. मी पण जाण्यासाठी काही पावले उचलली, पण लक्षात आले की आपल्या पायात बूट नाहीत. जरी त्या छोट्या टेकडीवर जाता आले नाही तरी मला क्रॉक्स घातल्याचा अत्यंत आनंद त्या क्षणी परत एकदा झाला. दिवसभर पायात बूट घालून पाय किती उबले असते ! आत्ताच तीन-साडेतीन तास उलटून गेले होते आणि पोखरा अजून लांब होते.
सकाळी साडेनऊला विमानतळावरून निघालेली बस संध्याकाळी साडेसहाला पोखरात पोहोचली. सर्वजण आपापली हाडे गोळा करून, नीट मोजून मगच बसमधून उतरले. आता नयापूल वरून ट्रेक तर शक्य नव्हता. ‘प्लॅन में ट्विस्ट’ आ गया था. आता इथे, म्हणजे जीपने पोखरात जिथे उतरवले तिथे, जीप्स येणार होत्या. आम्हाला जीपमध्ये कोंबणार होते. आणि खड्ड्यातून पळत जीप सरळ ‘घांड्रूक’ या गावात जाणार होती. उद्या सकाळी आमचा ट्रेक ‘घांड्रूक’मधून सुरु होणार होता. जीपमध्ये सर्वजण बसेपर्यंत अजून अर्धा तास मोडला. मी बूट न घातल्याचा परत एकदा मला त्याही परिस्थितीमध्ये आनंद झाला. जीपमध्ये सर्वात मागच्या सीटवर मी बसलो. साडेसातच्या सुमारास जीप निघाल्या. काहीच वेळात मुख्य रस्ता सोडून जीप धुळीच्या रस्त्यावर धावू लागल्या. जीप्स सर्व अंगांनी डचमळत होत्या. आजूबाजूला पूर्ण अंधार. कदाचित एका बाजूला दरी, आणि हेडलाईटच्या प्रकाशात जीप चालली होती. रस्ता असा नव्हताच. प्रवास संपता संपत नव्हता. जीपचा साईड ग्रॅब बार धरून माझ्या मधल्या बोटाच्या खाली कातडे सोलवटले. जीपला धक्केच एवढे बसत होते. शेवटी सव्वा नऊच्या सुमारास जीप एके ठिकाणी थांबली.
त्यानंतर आम्ही चालायला सुरवात केली. आधी वाटले हॉटेलच्या पायऱ्या चढतोय. पण नाही, मध्ये एकदोन वळणे पण घेतली. आज सकाळपासून आधी विमानतळावर जायला मॅटेडोर, नंतर पोखरापर्यंत मोठी बस, त्यानंतर इथपर्यंत जीप आणि आता चालत आम्ही निघालो होतो. बहुदा गावातून आम्ही चालत होतो आणि हिमालयातील गाव असल्यामुळे चढ उतार आणि वळणे! गाडीबिडी जाण्याचा प्रश्नच नव्हता. साधारण दहा मिनिटे चालत चालत आम्ही आमच्या पहिल्या ‘टी हाऊस’वर आलो.
‘टी हाऊस’वर पाटी होती ‘HOTEL DANDAGAUN’. मी जरा अंमळ मोठ्यानेच पाटी वाचली ‘दांडागांव’. शेजारून खळाळून हसण्याचा आवाज आला. डिक्की शेजारी उभी होती आणि माझ्या उच्चारावर हसत होती. क्षणात हसणे आवरून ती म्हणाली, “अरे, दांडागांव नहीं. ‘डाडा गाव’. ‘डाडा मतलब हिल !”. रात्रीचे साडेनऊ झाले होते त्यामुळे आजूबाजूचे गाव आणि आपण टेकडीवर आहोत, असे मात्र स्पष्ट दिसत नव्हते. जेवायला अजून थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे गरम गरम ‘लेमन-जिंजर’ चहा आला. आता पुढचे आठ दिवस, दिवस रात्र आम्हाला हाच चहा प्यायचा होता. जरा थंडी होती, त्यामुळे एक हलके जॅकेट अंगावर चढवले. इथे असलेल्या रूम वेगवेगळ्या साईझच्या होत्या. काही रूम ३ जणांसाठी, काही ४ जणांच्या तर काही ५ सुद्धा. आम्हाला ३ जणांची रूम मिळाली. मी नवनाथ आणि सुधाकर आज एका रूममध्ये होतो. पण खोली होती दुसऱ्या मजल्यावर. आता परत जिने चढून वर जायचे आणि जेवायला खाली उतरायचे. मला तर कंटाळा आला. आमचे उत्साही पार्टनर मात्र वर गेले. नंतर लक्षात आले की दोघांनीही लवकर जाऊन भिंतीलगतच्या कॉट पकडल्या आणि मला मधली कॉट ठेवली होती. संध्याकाळी जेवायला मी ‘अंडे घातलेला फ्राईड राईस’ मागवला. आता इकडे पोळ्या वगैरे विसरून जायच्या. जेवण करून रूममध्ये गेलो. आज एकदम मज्जा होती, कारण खोलीमध्ये टॉयलेट होते. आता पुढच्या गावांपासून टॉयलेट कॉमन असणार होते. हे गाव अगदीच ट्रेकच्या सुरवातीला असल्यामुळे इथे फ्री मोबाईल चार्जिंगदेखील होते. चार्जिंग पॉईंट एकच होता आणि फुल्ल होता. आता उद्या सकाळी काय ते बघू म्हणून मी झोपलो. ‘नवनाथ’ कॉटवर बसून ध्यानमग्न झाला होता. ‘सुधाकर’जींनी तोंडावर पांघरून घेतले होते. मला उजेडाचा फारसा फरक पडत नाही, त्यामुळे मी तसाच झोपलो. लाईट नंतर कधीतरी ‘नवनाथ’ने लाईट बंद केला असावा.
Continued in आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – ३
Experience By
शिरीष शेवाळकर
बी.ई. (मेकॅनिकल), जॅान्सन कन्ट्रोल्स या अमेरिकन कंपनीत ऑपरेशन प्रमुख म्हणून भारत, चीन, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांमध्ये काम. २०१८ मध्ये इंजिनियरींगच्या कामातून निवृत्ती.
सध्या राजहंस प्रकाशनामध्ये संचालक म्हणून कार्यरत आणि इतर छंद जोपासणे चालू आहे.
Facebook Page: Shirish Shewalkar