Annapurna Base Camp Experience: आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – १

  • Home
  • Latest News
  • Annapurna Base Camp Experience: आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – १

मागच्या वर्षी ज्या क्षणी एव्हरेस्ट बेस कँम्पचा ट्रेक संपला त्याच क्षणी अन्नपूर्णेचा ट्रेक पुढच्या वर्षी करायचा हे ठरले होते. शेर्पा नवांगला तसे सांगितले होते. त्याला ते खरे वाटले की उत्साहाच्या भरात केलेली घोषणा वाटली हे तोच जाणे. पण माझे जायचे नक्की होतेच. त्यामुळे ‘अन्नपूर्णा बेस कँम्प‘ करावा की ‘अन्नपूर्णा सर्किट’ करावा एवढाच विषय बाकी होता. दोन्ही ट्रेकच्या तारखा तर जाहीर झालेल्या होत्या. पण मागच्या ट्रेकच्या वेळेस पशुपतीनाथाचे दर्शन मी रेवतीच्या आधी घेतले म्हणून रेवती जरा नाराजच  होती. यावेळेस ‘अन्नपूर्णा बेस कँम्प’ ट्रेक पाच मेला संपत होता आणि सहा मेपासून वीणा वर्ल्डची नेपाळ ट्रीप सुरु होत होती. ‘अन्नपूर्णा सर्किट ट्रेक’ जरा मोठा होता आणि संपण्याच्या वेळेस कुणाचीच (केसरी, वीणा वगैरे)  नेपाळ ट्रीप नव्हती. मग निर्णय सोपा होता. अडचणी वाढवायच्या नसतील तर माझा ट्रेक आणि रेवतीबरोबर पशुपतीनाथाचे दर्शन अशा दोन्ही गोष्टी साध्य कराव्या लागणारच होत्या. मग काय घेतला निर्णय आणि लगेच भरले पैसे!

ट्रेकची तयारी तशी सुरूच होती. STF बरोबर काही रविवारचे ट्रेक आणि अधूनमधून सिंहगड! तेवढी तयारी आता मला पुरेशी होती. अन्नपूर्णा बेस कँम्पची उंची फक्त ४१३० मीटर होती. उंचीच्या बाबतीत माझा प्रवास तसा उलटाच झाला. मी आधी कैलास-मानसरोवर ट्रेक केला. कैलास परिक्रमेमध्ये सर्वात उंच ‘डोलमा पास’. या पासची उंची होती ५६५० मीटर (१८५४० फूट). त्यानंतर केला एव्हरेस्ट बेस कँम्प. त्याची उंची होती ५३६४ मीटर (१७५९८ फूट). सहा महिन्यापूर्वी ‘काश्मीर ग्रेट लेक्स‘ केला. त्यातील गडसर पास होता ४२०० मीटर वर (१३७५० फूट) आणि आता अन्नपूर्णा ४१३० मीटर. त्यामुळे अजिबात टेन्शन नव्हते. पण हा ट्रेक खूप सुंदर आहे हे मात्र ऐकून होतो.

एप्रिलच्या २६ तारखेला काठमांडूला जाण्यासाठी फ्लाईट होती. म्हणून २४ एप्रिलला सिंहगडला एक धावती भेट देऊ असे ठरवले. सकाळी जमणार नव्हते म्हणून दुपारी ३ वाजता निघालो. पावणे चारला चढायला सुरवात केली. काहीच वेळात आपण जरा दमलोय असे वाटले. बाहेर ऊन मी म्हणत होते. तापलेले खडक आणि डोंगरदेखील उष्णता बाहेर टाकत होते. आज सकाळच्या ब्रेकफास्टनंतर काहीच खाल्ले  नव्हते, त्यामुळे कदाचित पोट रिकामे आहे म्हणून दमणूक वाटत असेल, असा विचार केला. आज नेमके बरोबर खाण्यासाठी काहीच आणले नव्हते. वाटेत काहीतरी घेऊ असे ठरवले.  गड पन्नास टक्के होण्याच्या जरा आधी एक टपरी आहे. ती कायम उघडी असते असा माझा अनुभव होता. अगदी सकाळी पण उघडी असायची. तिथून काहीतरी घेऊ म्हणून चालत राहिलो. माझ्याकडे पाणी मात्र भरपूर होतं.

आज नेमकी ती टपरी बंद. मग वर जाऊन सरबत पिऊ म्हणून हळूहळू चालत राहिलो. माझा स्पीड खूपच कमी झाला होता, हे मलाच जाणवत होते. जरा भूक पण लागली होती. तसाच वर गेलो, तर सगळे सरबतवाले बंद. पार पार्किंगपर्यंत गेलो. पण काहीच खायला नाही. खायला काय प्यायला पण नाही. दही नाही, सरबत नाही. एकदा मनात विचार आला की आज जीपने खाली जाऊ. पण हट्टी मन काही ऐकायला तयार होईना. आता काय उतरायचेच आहे म्हणून उतरायला लागलो. तसाच खाली उतरलो आणि  यथावकाश घरी पोहोचलो. रात्री जेवण झाल्यावर झोपलो तर पाय प्रचंड दुखायला लागले. सिंहगडला जाऊन आल्यावर माझे पाय कधीच दुखत नाहीत. मला डीहायड्रेशन झाल्याचे लक्षात आले. मग लगेच ORS घेतले. पण ORS  घेतल्यावर त्याचा परिणाम व्हायला वेळ लागतो असं डॉक्टर मित्र बोरसे  दुसऱ्या दिवशी राजहंसमध्ये मला सांगत होते. काल काय झालं हे मी त्यांना सांगत होतो.  लक्षणं ऐकून त्यांनी पण डीहायड्रेशन झाले असेच सांगितले. निघायच्या एकच दिवस आधी हा एक धडा, जो खरं तर आधीच माहिती होता, पण अंमलात आणला नव्हता, तो नियतीने माझ्याकडून परत गिरवून घेतला. डोंगरात जाताना, थोडे खाणे, पाणी हे कायम बरोबर पाहिजे. कुठल्यावेळेस काय होईल सांगता येत नाही. त्याचप्रमाणे कुठलाही ट्रेक हलक्यात घेऊ नका, हा पण संदेश मनाच्या आत पोहोचला.

२६ तारखेला मुंबईला जाऊन विमानात बसलो. बघता बघता काठमांडू जवळ आले आणि मला मागच्या वर्षीची आठवण झाली. मी असाच काठमांडूच्या आकाशात आलो होतो. पण खाली जबरदस्त पाऊस पडत होता. विमान जवळजवळ एक तासाच्यावर हवेत घिरट्या घालत होते. आता परत भारतात जावे लागते की काय अशी वेळ आली होती. पण आज मात्र हवा साफ होती. विमानातून उतरल्यावर प्रथम नेपाळी सिम कार्ड घेतले. विमानतळाबाहेर आलो तर  ‘नवांग’, मागच्या वर्षी EBC ला असलेला शेर्पा स्वागतासाठी होता. नेहमीप्रमाणे गळ्यात झेंडूची माला घालून त्याने स्वागत केले आणि मला म्हणाला, “जाड झालास !”.

काय स्वागत होतं! मी हसून वेळ मारून नेली. ओळखीच्या मार्गाने, ओळखीच्या, (मागच्याच वर्षीच्या) हॉटेलमध्ये पोहचलो. यावर्षी मागच्या वर्षाप्रमाणे नवखेपणा नव्हता. काय करायचे ते नक्की माहीत होते. डफल बॅग मिळाली, त्यात ट्रेकला न्यायचे सर्व सामान भरले. आधीच माहीत होते की १० किलोच सामान न्यायला परवानगी आहे. त्यामुळे तेवढेच सामान प्लॅस्टिक पिशव्यात भरून तयार होते.

या वेळेस आमची ट्रेक लीडर एक महिला होती. ‘डिक्की’ अशी तिने स्वतःची ओळख करून दिली. तीस-बत्तिशीची मुलगी. काही वर्षांपूर्वी तिने एव्हरेस्ट सर केले होते आणि अशी एव्हरेस्टवीर आमची लीडर होती. तिचा आधीचा ट्रेक संपवून ती ‘पोखरा’त आली होती. तिची पोखरा ते काठमांडू फ्लाईट रद्द झाल्यामुळे ती आता बसने काठमांडूकडे यायला निघाली होती. उद्या सकाळी ती भेटणार होती.  

“दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून निघताना ट्रेक शूज घालायला पाहिजेत का?” माझी अंकितला (गिरीप्रेमीकडून लीडर) विचारणा.

“हो, हो. कारण उद्या पोखराला उतरलो की आपण ‘नया पूल’ला जाणार आणि तिथून चालायचे आहे.

मला बूट घालायचा अत्यंत कंटाळा. सिंहगडला जाताना पण मी कारमधून बूट घेऊन जातो आणि मग चढण्यापूर्वी घालतो. उतरलो की लगेच बूट काढलेच. आता पण माझे मन विमानातून ते बूट घालून जायला राजी होत नव्हते. म्हणून मी अजून एक प्रश्न विचारला.

“नया पूलला आमच्या बॅगमधून सामान काढता येईल ना?”

“हो. हो.” अंकित

मी लगेच निर्णय घेतला. ‘गोली मारो शूज को’. नया पूलला डफलमधून काढू आणि घालू. मग सुटसुटीत क्रॉक्स पायात घातले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आमची काठमांडू ते पोखरा अशी फ्लाईट होती. साधारण ४० मिनिटांची. आम्ही काठमांडू डोमेस्टिक विमानतळावर पोहोचलो. सामान स्क्रीन झाले. आम्ही आशा करत होतो की आज फ्लाईट रद्द होऊ नये. पण अर्धा तास झाला तरी काहीच होईना. मग समजले की पोखराला व्हिजिबिलिटी  खूप कमी आहे. त्यामुळे विमान लँड होऊ शकत नाही. साहजिकच मनात प्रश्न आला की हे काय आत्ता माहीत पडले का? कालपासून हेच चालले आहे. आधी चौकशी का नाही केली.  मग एवढा वेळ वाया का घालवला. तर म्हणे एअरलाईन्सचे नियम. आम्ही इथे आलो नसतो तर ‘नो शो’ म्हणून तिकिटाचे पैसे परत मिळाले नसते. आता आम्ही आलो होतो, पण हवा खराब होती म्हणून विमानच रद्द झाले. त्यामुळे आता पैसे परत मिळणार होते. त्यासाठी हा सव्यापसव्य ! 

आता पुढे?

Continued in आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – २

Experience By

शिरीष शेवाळकर

बी.ई. (मेकॅनिकल), जॅान्सन कन्ट्रोल्स या अमेरिकन कंपनीत ऑपरेशन प्रमुख म्हणून भारत, चीन, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांमध्ये काम. २०१८ मध्ये इंजिनियरींगच्या कामातून निवृत्ती.
सध्या राजहंस प्रकाशनामध्ये संचालक म्हणून कार्यरत आणि इतर छंद जोपासणे चालू आहे.

Facebook Page: Shirish Shewalkar

Comments are closed